संत मुक्ताईच्या पालखीसाठी वडीगोद्रीत हक्काचा निवारा
सतीश घाटगेंनी पूर्ण केला भाविकांना दिलेला शब्द : सभागृहाच्या कामास प्रारंभ
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
16 जुलै अंबड : दरवर्षी अंबड तालुक्यातील वडीगोद्रीत संत मुक्ताईची पालखी मुक्कामाला असते. या मानाच्या पालखीला हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचा शब्द मागील वर्षी भाजपा नेते सतीश घाटगे यांनी दिला होता. त्यानुसार 25-15 जनसुविधा योजने अंतर्गत शासनाकडून दहा लक्ष रुपयाचा निधी उपलभ करून देत सतीश घाटगे यांनी आपला शब्द पूर्ण केला. या सभागृहाच्या कामाचे मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन झाले.
आदिशक्तीचा अवतार असलेल्या संत मुक्ताईच्या पालखीला तीनशे वर्षाहून अधिकाची परंपरा आहे. दर वर्षी ७५० किमीचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाते. वडीगोद्रीत या पालखीचा मुक्काम ठरलेला असतो. गेल्या वर्षी संत मुक्ताईच्या पालखीचे सतीश घाटगे दर्शन आले असता अचानक पाऊस आल्याने पालखीसोबत आलेल्या वारकरी व मुक्ताईभक्तांची गैरसोय झाली होती. त्यावेळी मुक्ताईच्या पालखीसाठी सभागृह निर्माण करण्याचा शब्द सतीश घाटगे यांनी दिला होता.
त्यासाठी शासनाकडून दहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळाले. या निधीतून सरपंच पंढरीनाथ नाना खटके व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या सभागृहाची मंगळवारी पायाभरणी झाली. लवकरच संत श्रेष्ठ मुक्ताईच्या पालखीसाठी सुसज्ज आणि भव्य असे विसावा सभागृह या ठिकाणी साकारणार आहे.