सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जिल्हा परिषद शाळांनाही त्याचा मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पुणे येथील व्हीके ग्रुपच्या सीएसआर निधीतून व सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हज यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर व वांगी येथील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये सामाजिक प्रकल्प राबविण्यात आले.
वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्यायोग्य पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने, तेथे विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प (आरओ प्लांट) बसविण्यात आला. तसेच हत्तूर येथील जिल्हा परिषद शाळेतील किचन शेड अतिवृष्टीमुळे पूर्णतः खराब झाल्याने, तेथे नव्याने किचन शेड व स्टोअर रूम बांधून देण्यात आली.
या प्रकल्पांसाठी व्हीके ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी संकलन करून या सामाजिक उपक्रमास हातभार लावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दोन्ही सामाजिक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्हीके ग्रुपच्या अपूर्वा कुलकर्णी यांनी सांगितले की, “असे प्रभावी आणि गरजाधारित सामाजिक प्रकल्प राबविण्यासाठी व्हीके ग्रुप नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतो. दोन्ही गावांतील शाळांची परिस्थिती लक्षात घेऊनच येथे हे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.”
तर सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हजचे अमोल उंबरजे यांच्या हस्ते दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, “आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतो. सोलापूर जिल्ह्यातील या शाळांच्या गरजा ओळखूनच हा उपक्रम हाती घेतला.”
दोन्ही शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार असून, त्याचा योग्य उपयोग केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शाळांच्या गरजा ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल दोन्ही गावांतील ग्रामस्थ व पालकांनी व्हीके ग्रुपच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करत आभार मानले.
या प्रकल्पासाठी मुख्याध्यापक सिद्धाराम गुरव, शिक्षक सतीश राठोड, मुख्याध्यापिका वसुधा हिप्परगे व शिक्षक वामन धुळराव, वैशाली आठवले, मेघना पिंगळे आणि नम्रता पाठक यांनी समन्वय साधला. उद्घाटन सोहळ्यास ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















