देगलूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ देगलूर शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी धनाजी जोशी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धनाजी जोशी हे राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य – मराठवाडा विभागाचे अध्यक्ष असून त्यांनी सामाजिक बांधिलकीतून ही मागणी प्रशासनापुढे मांडली आहे. निवेदनात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत, राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सिंचन प्रकल्प, कृषी विकास, ग्रामीण भागाचा विकास, पायाभूत सुविधा तसेच प्रशासनातील धाडसी व लोकाभिमुख निर्णयांमुळे अजितदादा पवार यांनी सामान्य जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. शेतकरी, कष्टकरी, युवक व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने ठाम भूमिका घेतली, असे निवेदनात म्हटले आहे.
दि. 28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. त्यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी, यासाठी देगलूर नगरपरिषदेच्या हद्दीतील एक एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी सदर निवेदन स्वीकारून याबाबत योग्य त्या स्तरावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. देगलूर तालुक्यात या मागणीची सध्या चर्चा सुरू असून विविध स्तरांतून या मागणीस पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

























