पंढरपूर – शाकंभरी पौर्णिमे निमित्त कुळधर्म, कुळाचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साठ भाज्यांची किंमत येथील बाजारात शुक्रवारी (ता.२) तब्बल १ हजार २५१ रुपये होती. येथील इंदिरागांधी भाजी मार्केट मध्ये शहरातील देवमारे कुटुंबियांकडून गेल्या चार पिढ्यांपासून या भाज्यांची विक्री केली जाते. पंढरपूरातील प्रामुख्याने ब्राम्हण तसेच लिंगायत समाजातील काही कुटुंबियांचे शाकंभरी देवी हे कुलदैवत असल्यामुळे या कुटुंबियांकडून दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरीच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते. त्यामुळे या दिवशी घरात कुळधर्म, कुळाचार करण्याची पध्दत आहे. त्यासाठी या भाज्यांची आवर्जून त्यांच्याकडून खरेदी केली जाते.
भारताची दक्षिण काशी तथा तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे बनशंकरी म्हणजेच शाकंभरी नवरात्र उत्सव पुर्व परंपरेप्रमाणे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. शाकंभरी देवीला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तब्बल ६० प्रकारच्या विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो, वैशिष्ठ म्हणजे सवाश्ण, ब्राम्हण, कुमारिका यांना रामप्रहरी सकाळी ६ वाजता म्हणजे घरमाशी उठायच्या आत देवीला नैवेद्य दाखवून भोजन द्यावे लागते, यामुळे शाकंभरी नवरात्र साजरा होणाऱ्या घरातील स्त्रियांना मध्यरात्रीच उठून स्वयंपाकाची तयारी करावी लागते,
पंढरपूर येथील परिचारक, कटेकर, पूजारी, आवताडे, ऐतवाडकर, सप्ताश्व ही घराणी शेकडो वर्षांच्या पूर्वजांच्या परंपरेनुसार शाकंभरी नवरात्र साजरा करतात. येथील लिंगायत वाणी समाजातील काही कुटुंबियांचे देखील शाकंभरी देवी हे कुलदैवत आहे. त्यांच्या घरातून देखील कुळधर्म, कुलाचार केला जात असतो त्यासाठी या भाज्यांची आवश्यकता असते. या निमित्ताने कधीही न पाहिलेल्या दुर्मिळ अशा आयुर्वेदिक गुणांनी युक्त आरोग्यदायी फळभाज्या, पालेभाज्या पोटात जातात,
पंढरपूर येथील देवमारे कुटुंबीय खास देवीची सेवा म्हणून या दुर्मिळ भाज्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देतात. विशेष म्हणजे लातूर, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यासह आजूबाजूच्या खेडेगावात रानोमाळ भटकत या भाज्या देवमारे कुटुंबियांकडून गोळा केल्या जातात, यासाठी त्यांना पाच ते सात दिवस लागतात. येथील देवमारे कुटुंबियातील गणपत महादेव देवमारे, राजाराम हरिभाऊ देवमारे, बसवेश्वर भगवान देवमारे, प्रवीण पांडूरंग देवमारे हे चौघे फिरून त्यांनी या दुर्मिळ भाज्या गोळा केल्या आहेत. देवमारे यांची ही चौथी पिढी आहे.
दरम्यान कुळधर्म, कुळाचारासाठी येथील काही कुटुंबियांकडून नव्वद,शंभर तर काही कुटुंबियांकडून साठ भाज्यांची खरेदी करण्याची परंपरा आहे. पूर्वी प्रमाणे शंभर किंवा त्याहून अधिक भाज्या एकाचवेळी सध्या मिळत नाहीत. मात्र देवमारे कुटुंबिय अथक परिश्रम करुन विविध प्रकारच्या ६० ते ८० भाज्या उपलब्ध करुन देतात. या वर्षी देवमारे यांनी ८८ विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. या भाज्यांमध्ये तब्बल पंचेचाळीस फळभाज्या तर बेचाळीस पालेभाज्यांचा समावेश आहे.
पंढरपूर येथील शाकंभरी दैवत असलेली ही घराणी कर्नाटक राज्यातील बदामी येथे वर्षातून एकदा तरी दर्शनास जात असतात. ज्यांना बदामी येथे जाणे जमत नाही ते पंढरपूर तालुक्यातील भाळवणी याठिकाणी असलेल्या शाकंभरी देवीच्या दर्शनास जातात.
————————
आठ दिवस फिरुन गोळा कराव्या लागतात भाज्या
देवीस शंभर किंवा साठ प्रकारच्या विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवावा लागतो पण पंढरीतील देवमारे कुटुंबीय खास सेवा म्हणून आठ आठ दिवस फिरून या दुर्मिळ रानभाज्या गोळा करतात येथील इंदिरा गांधी भाजी मार्केट मध्ये एक सेट १ हजार २५१, रुपयांना मिळतो,या भाज्या खरेदी करण्यासाठी पहाटे पासुन गर्दी असते, उशीर झाला तर भाज्या संपून जातात.
————————
या भाज्यांचा असतो समावेश
शांकभरी निमित्त लागणाऱ्या भाज्यात कोहाळे, आवळा, केव डागर,काशी भोपळा,काळी कोयरी,काळ माशी गड्डा, शिंगोळी,चिंच, उंबर दिंडी, काळा माका, मुकणी, राजगिरा, तांदुळसा ,मुखणी, राजहंस,वासनी तेल, पाथर, कातमोडा, चिल,कडीपत्ता,मोहरी,माठ, काटेमार, कुजीर, कासुदा, अंबाडा, जवस,चुका,चाकवत,चुची, कपाळफुटी,जवस,सुपारी वेल, काड कुसुळा, तुरी,दुधनी,पडवळ,तोंडली, पटाडी शेंग, गोकर्ण शेंग,कवठ, बोर, केळी, कडे बळा, केळीफुल ,रताळी वेल, कामुळ्या, आळू, आळु गड्डा,पपई,हरभरा,गाजर, गाजरपाला, मेथी,काशी भोपळा, पुदिना, देशी टोमॅटो, हादगा फुल, हादगा शेंग, हादगा पाला, रान पावटा, शेवगापाला, शेवगा शेंगा, मुळापाला , मुळा , मुळा शेंगा,वांगी, दोडका, गवारी,भेंडी, घेवडा, पावटा, दुधी भोपळा, वाळुक, कारले,कोबी, फ्लॉवर कोबी,गाजर, वाटाणा, शेपू, चिघळ,पालक,मिरची, करडा,घोळ,कोथींबीर, घोसावळे,चवळी,तुरी आदीं ८७ ते ८८ प्रकाराचा भाज्या गोळा केल्या जातात.
























