महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करून काँग्रेससह एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडने दिला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचे समजते. मात्र त्यावर शरद पवार गटाची पुण्यात बैठक झाली. त्यात हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे.
शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नाही, असे आमदार अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले. आजच्या बैठकीत राज्यसभा, लोकसभा निवडणुका तसेच चिन्ह आणि मेळावा या विषयांवर चर्चा झाल्याचे दोघांनी सांगितले. पुण्यातील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती.
दुसऱ्या पक्षात विलिन होण्याच्या बातम्या तथ्यहीन – प्रशांत जगताप
याबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सदर वृत्त साफ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पवार नावाची भीती वाटत असल्याने अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असे जगताप म्हणाले. जगताप पुढे म्हणाले की, आमचे विद्यमान आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री यांची बैठक पवारांनी घेतली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाली. या प्रकरणाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत लावण्याकरता मागणी करण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं. शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली आम्हाला लढायचं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाव आणि चिन्ह दिलं तर आम्ही आमची स्वतंत्र भूमिका घेऊन विधानसभा आणि लोकसभेत जनतेसमोर जाणार आहोत. त्यामुळे आजच्या बैठकीत केवळ पक्ष नाव आणि चिन्हाबाबत चर्चा झाली. दुसऱ्या पक्षात विलिन होण्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्णय करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही शरद पवारांच्या नावाने जनतेत जाऊ आणि निवडणूक लढवू, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर रमेश चेन्नीथला यांची काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यासोबतच रमेश चेन्नीथला यांनी शरद पवार यांच्यासमोर त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला होता. तसेच राष्ट्रवादीची घड्याळ हे चिन्हही अजितदादा गटाचे असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाने तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हे नाव स्वीकारले आहे. त्यामुळे आता हा गट कायमचा ठेवायचा की काँग्रेसमध्ये जायचे, हा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर आहे.
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द
शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. १९६७ साली ते बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर ते १९९९ पर्यंत काँग्रेस पक्षात होते. यानंतर त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वाशी मतभेद झाल्यामुळे बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.