सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी सोलापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना संपूर्ण ताकतीने सज्ज आहे. स्नमानपूर्वक जागा मिळाल्यास युती बाबत आज दी.२१ जानेवारी दुपारी १२ पर्यंत ठरणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
दुपारी दोन वाजे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. युतीचा निर्णय न झाल्यास उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील. या दौऱ्यादरम्यान मंत्री दादा भुसे यांनी शहर व जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील यांना दिल्या. संघटन बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले.
महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात शिवसेनेच्या हालचाली अधिक वेगवान झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून, आगामी निवडणुकीत शिवसेना आक्रमक भूमिकेत उतरण्याचे संकेत मिळत आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आल्याने शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या दौऱ्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मंत्री दादा भुसे यांचे सोलापुरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती भेट देऊन स्वागत केले. ही भेट आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
संघर्षमय परिस्थितीतही शिवसेनेच्या वतीने अमोल शिंदे, अनिकेत पिसे, प्रियदर्शन साठे या तिन्ही वाघांनी तसेच रणरागिणी मनोरमा सपाटे यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल मंत्री दादा भुसे यांनी विशेष अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. “संघर्षातून उभे राहिलेले हे नेतृत्वच शिवसेनेची खरी ताकद आहे,” असे स्पष्ट संकेत भुसे यांनी दिले.
याप्रसंगी माजी आमदार व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, संकेत पिसे, ज्ञानेश्वर सपाटे, यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.























