लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्य नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. या प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन देत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना हा संख्या बळानुसार चौथा मोठा घटक पक्ष आहे.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या गटनेतेपदी निवड करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावाला अनुमोदन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आणि संस्मरणीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’च्या नेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेकडून पूर्ण पाठिंबा देतो, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला आणि देशाला प्रगतीपथावर आणले. जगभरात भारताचा नावलौकिक वाढवला. देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत केले आणि भारताची नवी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे विरोधकांनी खोटा प्रचार आणि अफवा पसरवून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र असे खोटे नॅरेटिव्ह आणि अफवा पसरवणाऱ्यांना देशातील जनतेने नाकारले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीकारले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना आणि भाजप एक समान विचारधारा असलेले पक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातून तयार झालेली शिवसेना भाजप युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तो कधीही तुटणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे कविता सादर करत अभिनंदन केले. ते म्हणाले की, “मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खिंचा है मैं पत्थर पे लिखी इबारत हु, शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. संसदेत उपस्थित नवनिर्वाचित खासदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. या बैठकीला शिवसेनेचे खासदार उपस्थित होते.