सोलापूर – तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी नवरात्र उत्सवास (देवदीपावली) आज प्रारंभ झाला. चंपाषष्ठी षडरात्र श्री खंडोबा देवाचा प्रमुख उत्सव मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेस देवाची घटस्थापना मोठ्या उत्साहात श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात करण्यात आली. आजपासून पाच दिवस दिवे प्रज्वलित करून धार्मिक विधींची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रींच्या मंदिर परिसरात सर्वत्र धार्मिक नवचैतन्य पसरले होते.
दरम्यान, ज्या भक्तांच्या घरी खंडोबा कुलदैवत आहे. त्या भक्तांच्या घरांमध्ये ही घटस्थापना करण्यात आली. प्रतिपदेस घटस्थापना करून सहा दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घरातील कुटुंब प्रमुख उत्सवात उपवास केला जातो. घटावर फुलांची माळ सोडली जाते. चंपाषष्ठीस गटाचे उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात.

या धार्मिक विधीसाठी प्रत्येकी ५ काळ्या खारका, ५ फळे, १ डझन केळी, सव्वा किलो हळद, तांदूळ, ताम्हण, तांब्या, उदबत्ती, कापूर, हळदी, कुंकू, कापसाचे वस्त्र, नवीन कापड,५ लिंबू, हळद कुंकू भरून खोबरे वाटी एकात हळद व एकाच कुंकू, पांढरा दोरा प्रासादिक साहित्यांनी धार्मिक विधी संपन्न करण्यात आला. सहा दिवस समई पेटती ठेवावी लागते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच देव दीपावली खंडोबा नवरात्र आरंभ झाला आहे. यावेळी साऱ्या बाळे परिसरातील भक्तांच्या घरोघरी उत्साहाचे आनंदाचे आणि धार्मिकतेचे वातावरण दिसून आले.
पूजेची मांडणी योग्य रीतीने करावी.
आपल्या घरातील देवघर स्वच्छ करून घेणे. घराची स्वच्छता करणे. देवघरातील मूर्तींना पंचामृताने अभिषेक घालावा. नवीन वस्त्रावर विड्याच्या पानावर देवाचे आसन करावे. नंदादीप स्वच्छ करून ६ दिवस सतत तेवत ठेवण्यात येणार आहे. ताम्हनामध्ये धान्य तांदूळ घेऊन त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडण्यात आले. त्यामध्ये पाणी, नानी, सुपारी घालावी व त्यावर खाऊची ५ पाणी मांडावीत (ठेवावीत). तांब्याच्या बाहेरील बाजूस सूत गुंडाळावे व कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. घटासमोर ५ विडे मांडून त्यावर खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, हळकुंड ठेवावे व देवांच्या शिपायाचे २ विडे ठेवण्यात आले. त्यावर सुपारी व लिंबू ठेवून भंडारा, गुलाल लावण्यात आला.
– गणेश पुजारी, श्री खंडोबा मंदिराचे पुजारी
पाचवा दिवस
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देव मुटके, पुरणाचे ५ दिवे करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला ओवळावे. तेलाने वाती प्रज्वलित करून औक्षण करण्यात येते.
सहावा दिवस
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक करावा. चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी. घटावर फुलांची माळ लावावी. दिवटी प्रज्वलित करून देवाला ओवाळावे. पुरणाचा नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, नवा कांदा, दहीभात, लिंबू, गाजर इत्यादी नैवेद्य दाखवून ५ मुले बोलावून घट उचलावा. येळकोट येळकोट असा जयघोष करून त्यानंतर तळी भंडारा करावा. दिवटी बुधले प्रज्वलित करण्यात येते.
तळी भंडार
ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर ५ विड्याची पाने व त्यावर सुपारी खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी. ५ मुलांना बोलवून येळकोट येळकोट म्हणत तळी उचलण्यात येते.

























