सोलापूर – श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांची ७० वी पुण्यतिथी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भक्तीभावाने साजरी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे २.१० मि. उत्तर कसबा येथील होटगी मठात चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करून वीरतपस्वीजीना श्रद्धांजली समर्पण करण्यात आली.
यावेळी वडांगळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, मागणगिरीचे विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, वेळापूरचे मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी,जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, कडब गावचे वीरशिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती .त्यानंतर पहाटे ५.३० वा. काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या शिरावर श्री वीरतपस्वी आत्मज्योत धारण केले.
यावेळी उपस्थित भाविकांनी ‘श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज की जय’, ‘तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत सर्वात पुढे ट्रॅक्टरवर श्री वीरतपस्वीजींची प्रतिमा, हलगी, हळदे बँड, विविध गावचे पुरवंत श्री वीरतपस्वी यांची पालखी, विद्यार्थ्यांचे पथक, बैलजोडी व रथ यासह ही मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटी गल्ली, मंगळवार पेठ, मधला मारुती, विजापूर वेस,पंचवटी, गुरुभेट ,सात रस्ता, गांधीनगर,होटगी नाका, मजरेवाडी या पारंपारिक मार्गाने ही मिरवणूक निघाली. मिरवणूक मजरेवाडी ( विसावा )येथे आल्यानंतर मजरेवाडीतील सुवासिनी डोक्यावर जलकुंभ आणून भक्तीभावाने आत्मज्योतीचे स्वागत केले .मिरवणुकीच्या वाटेवर ठिकठिकाणी भक्तानी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या घालून मिरवणुकीचे स्वागत करीत होते व आत्मज्योत आपल्या शिरावर घेत होते मिरवणूक होटगी येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी आत्मज्योतीचे स्वागत करून गावातून भव्य मिरवणूक काढली.
आत्मज्योतीचे मठात आगमन झाल्यानंतर महामंगलारती होऊन श्री वीरतपस्वी आत्मज्योत पदयात्रेची सांगता करण्यात आली.यावेळी शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये धर्मसभा झाली.
. सायंकाळी ४.०० वा. रथोत्सव कार्यक्रम पार पाडला. भक्तानी पदयात्रेत विविध ठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.श्री सिद्धेश्वर कारखान्याच्या वतीने उसाचा रस देण्यात आला. कला संगम फाउंडेशनच्या वतीने होटगी मठ ते बाळीवेस पर्यंत रांगोळीच्या सुंदर पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यामध्ये रूपाली कुताटे, अश्विनी भोगडे ,अश्विनी नागणसूरे, श्रावणी दर्गो पाटील, संध्या वैद्य, रक्षा रायकर, अविनाश जिंकेरी व त्यांच्या सहकार्यानी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संजय भोगडे व दासोह स्वामी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे मिरवणुकीतील भक्तांना गंध लावण्याचे काम केले. वीर तपस्वी स्काऊट पथक एमआयडीसीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेचे काम केले.या मिरवणुकीत , होटगी, बोरामणी, धोत्री, दर्गनहळी, लिबिचिंचोळी, बोरेगाव, सातनदुधनी, मुस्ती, कुंभारी, खानापूर, सरसंबा येथील सदभक्त, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक- मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. होटगी येथे सर्व भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी सायंकाळी उज्जैन जगद्गुरु राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या भक्तानी रुजू केली गुरुचरणी सेवा- पहाटे ५.०० वाजता आत्मज्योतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर जिल्हा परिषदे जवळ शिवानंद हिरेमठ परिवाराच्यावतीने सुंदर रांगोळी काढून आत्मज्योतीचे स्वागत करण्यात आले. गुरुभेट येथे उमदी परिवारावतीने, किनारा हॉटेलजवळ श्री गुरुचन्नबसव प्रतिष्ठान(दुलंगे परिवार)च्या वतीने सुगंधी दूध, प्रकाश जमा यांच्या वतीने केळी, आसरा येथे तंबाके ज्वेलर्स च्या वतीने सुगंधी दूध, मुलतानीया बेकरी येथे युवराज पाटील व प्राईम केअर हॉस्पिटल च्या वतीने चहा व पाणी, मजरेवाडी येथे शिवपुत्र कलगीकर यांच्या वतीने सोनपापडी, रत्नाकर हुककेरी यांच्यावतीने मसाला भात, भारतमाता येथे काशी वधू वर सूचक मंडळाचे शोभा स्वामी यांच्या वतीने उपीट,लक्ष्मीकांत त्रिशुले यांच्या वतीने केळी, शंकरलिंग भोगडे च्या वतीने चहा- पाणी, चिवडशेट्टी कृषी केंद्र येथे गंगाधर चिवडशेट्टी यांच्या वतीने उपीट व शिवानंद चिवडशेट्टी यांच्या वतीने लाडू, भाग्यश्री पार्क येथे सिद्धाराम बिराजदार, हत्तुरे वस्ती येथे संजीव हॉस्पिटल याच्या वतीने केळी, कामरान चौक येथे नदीम शेख यांच्या वतीने केळी, भोगडे पेट्रोलियमच्या वतीने पाणी, शंकर नगर येथे ढोले, पाटील, विजापूर, हणमगौडा यांच्या वतीने मसाला दूध, होटगी येथे शिवशक्ती परिवार,सदभक्त व विश्वनाथ रामपुरे यांच्या वतीने प्रसाद व हरीष पाटील यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करून या भक्तांनी गुरुचरणी आपली सेवा समर्पित केली. विशेष म्हणजे मिरवणूक मार्गात भक्तांना प्रसाद वाटप करणाऱ्या भक्तांच्या संख्येत यंदाच्या वर्षी वाढ दिसून आली. मिरवणुकीत सहभागी असलेल्या भक्तांना आरोग्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉ.राजीव मठ व डॉ. किशोर गायकवाड यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलच्या वतीने ॲम्बुलन्स व औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यांच्या या समाजोपक्रम कार्याचे भक्तानी कौतुक केले.
















