मुदखेड – तालुक्यांतील पांगरगाव येथील शिध्दोधन भिमराव शिंदे यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाल्याने पांगरगावसह परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शिध्दोधन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगरगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यालय, सिडको येथे पूर्ण केले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण स्व. कुसुमताई चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय, सिडको, नांदेड येथे पूर्ण करून त्यांनी आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.
शिध्दोधन यांचे वडील भिमराव किशन शिंदे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांनाही त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही पाठी फिरवली नाही. सिडको परिसरात मिळेल ते काम करून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. आई-वडिलांच्या त्याग, कष्ट व संस्कारांचे फळ म्हणून आज शिध्दोधन यांना देशसेवेची संधी मिळाली आहे.
शिध्दोधन यांच्या या यशाबद्दल पांगरगावचे भूमिपुत्र ग्रामपंचायत अधिकारी गजानन टोपाजीराव गाढे ,पोलीस पाटील बालाजी व्यंकटी गाढे यांच्या हस्ते शिध्दोधन व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. सर्वांनी शिध्दोधन यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


























