देगलूर – “केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजप” — ही केवळ घोषणा न राहता वास्तवात उतरल्याचे चित्र अलीकडील नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांतून स्पष्ट झाले आहे. जनतेने भाजपाच्या बाजूने दिलेल्या निर्णायक कौलामुळे पक्षाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून, त्याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर होताना दिसत आहे.
नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांतील घवघवीत यशानंतर भाजपामध्ये इच्छुक उमेदवारांची अक्षरशः उसळलेली लाट पाहायला मिळत आहे. भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली तर विजय सहज शक्य आहे, असा समज राजकीय वर्तुळात बळावत असून, त्यामुळे इतर पक्षांतील अनेक इच्छुक भाजपाच्या वाटेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, पक्षांतराच्या चर्चांना उधाण येण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात भाजपासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरले अशोकराव चव्हाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून काढले असताना, नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपासाठी पुन्हा एकदा ‘ट्रम्प कार्ड’ ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपाच्या गोटात इच्छुकांची गर्दी वाढणे अटळ मानले जात आहे. देगलूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपाची तिकीटे मिळवण्यासाठी चुरस निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
आ. जितेश अंतापुरकरांना ‘हिरो’ होण्याची सुवर्णसंधी!
देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. मागील देगलूर नगरपरिषद निवडणुकीत प्रचार यंत्रणा आणि नियोजन सपशेल अपयशी ठरल्याने भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे आमदार अंतापुरकरांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मात्र आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आमदार अंतापुरकरांसाठी आव्हानासोबतच मोठी सुवर्णसंधी ठरू शकते. देगलूर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गण या निवडणुकांत परिपूर्ण नियोजन, योग्य उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक एकजूट साधता आली, तर भाजप सर्वाधिक जागेवर विजय मिळवू शकतो. जुना–नवा भाजप असा अंतर्गत वाद बाजूला ठेवत “साथ चलो”ची भूमिका घेतली, तर आमदार अंतापुरकर हे या निवडणुकीत ‘हिरो’ ठरू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हाताळणारे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण आणि राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी रणनीती आखल्यास देगलूरच्या राजकारणात भाजप मोठी झेप घेऊ शकतो. एकंदरीत, भाजपाच्या विजयाचा हा ‘साइड इफेक्ट’ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार, हे मात्र निश्चित!

























