गोपीनाथ मुंडे यांचे आपल्यावर संस्कार असून आपण जातीवाद कधीही मानत असं भावनिक आवाहन करत मराठा भावाच्या मदतीसाठी आपण नगरमध्ये प्रचारासाठी आले असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी सुजय विखेंना मतदान करावं असं मतदारांना आवाहन केलं.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हवामान खराब असताना हेलिकॉप्टरने प्रवास करत अहमदनगरच्या पाथर्डी येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. तब्बल साडेतीन तास उशिराने आलेल्या पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांना मतदान करण्याची विनंती केली. विशेष म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात जातीवाद सुरू असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. आपण मराठा भावाच्या मदतीसाठी आलो असून गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आपल्यात आहेत, जे कधीही जातीवाद मानत नाहीत अशी भावनिक साद त्यांनी आपल्या भाषणात मतदारांना घातली.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या सभा सुरू असून शेवटच्या काही तासात मतदारांना साद घालण्यासाठी उमेदवार धावपळ करताना पाहायला मिळतात.
बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद?
बीड लोकसभेसाठी मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असून भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत होणार आहे. मराठवाड्याच्या या पट्ट्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असल्याने पंकजा मुंडेची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. बीडमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असल्याचं चित्र आहे.
बीड जिल्ह्यातील जातीय मतांचा आकडा – एकूण मतदान 21 लाखाहून अधिक
मराठा – सात ते साडेसात लाख
वंजारी – साडेचार ते पाच लाख
दलित – दोन ते सव्वा दोन लाख
मुस्लिम – सव्वा दोन ते अडीच लाख
ओबीसी – म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख
लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होणार
आता बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढे येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बीडमध्ये झालेलं मराठा आरक्षणाचे तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका.या निवडणुकात मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय ते निर्माण होताना पाहायला मिळतय. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा. मात्र या वेळेस या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होतील असं काही ज्येष्ठ पत्रकारांना वाटत आहे.