पंढरपूर – तालुक्यातील भंडीशेगाव येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वेळापूर ता.माळशिरस येथील महिलांनी ऊसतोड कामगारांसाठी कपडे त्याचबरोबर थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटरचे वाटप डॉ.शुभांगी उमेश नाईक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रतापसिंह टकले यांच्या हस्ते करण्यात आले.
ऊसतोड कामगारांना आपल्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणती काळजी घ्यावी या संदर्भात वेळापूर येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. शुभांगी नाईक यांनी मार्गदर्शन केले.
वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर साप्ताहिक मिलन व गीता परिवार तसेच सेवा भारती आणि श्री गुरुजी प्रतिष्ठान पंढरपूर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या थंडीचा कडाका वाढला असून ऊस तोडीचे दिवस सुरू आहेत.अशा थंडीमध्ये आपल्या लहान लहान चिमुकल्यांना घेऊन हे ऊसतोड कामगार काम करीत असतात. याची जाणीव ठेवून वेळापूर येथील महिलांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व प्रकारचे कपडे त्याचप्रमाणे थंडीसाठीचे उबदार कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.शुभांगी नाईक, पुष्पांजली प्रतापसिह टकले, प्रतापसिंह टकले, प्रदीप टकले,अनिल विभुते, स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार आदी उपस्थित होते.


















