अक्कलकोट : दिव्यांग म्हणून जन्माला येणे ही कोणत्याही पालकाची किंवा त्या बालकाची चूक नसून समाजाने दिव्यांगांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि त्यांना इतर मुलांप्रमाणे वाढण्यासाठी मदत करावी, असे प्रतिपादन विधिज्ञ शरद फुटाणे यांनी केले.
ते अबनॉर्मल होम मानवीय संशोधन संस्था, पुणे, रामकृष्ण परमहंस सेवा केंद्र, सक्षम दिव्यांग सेवा केंद्र आणि श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग बालक, पालक व संस्था प्रतिनिधींच्या सक्षमीकरणासाठीच्या एकदिवसीय कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
फुटाणे पुढे म्हणाले की, देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत दिव्यांगांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र केवळ योजनांवर अवलंबून न राहता पालकांनी सक्षम सारख्या संस्थांच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व श्री स्वामी समर्थ राजेराय मठाचे सचिव डॉ. किसन झिपरे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, दिव्यांग बालके जन्माला येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून यासाठी आधुनिक विज्ञानात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. पालकांनी फक्त शासकीय योजनांच्या मागे न लागता आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेतील सत्रांमध्ये श्री. दागा यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पालक व बालकांनी कसे सक्षम व्हावे याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात किशोरी पाठक यांनी दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण व परिपूर्ण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रकाश टाकला.
पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन डॉ. पंकज मीठ भाकरे, डॉ. तपसाळे तसेच सक्षम केंद्राच्या जिल्हाध्यक्ष नंदिनी मालगत्ते यांनी मुलाखत पद्धतीने केले व स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत एकूण ७८ दिव्यांग बालक व पालक उपस्थित होते. सक्षम दिव्यांग सेवा केंद्राच्या वतीने दिव्यांगांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती असलेली पुस्तिका सर्व पालकांना मोफत वितरित करण्यात आली.
कार्यशाळेस रोटरी क्लबचे अध्यक्ष जी. एस. पाटील व सचिव श्री. तोरस्कर यांनी सदिच्छा भेट दिली. उद्घाटनप्रसंगी संतोष वगाले, विश्वस्त बाळू मोरे, प्राचार्य बसवराज वेळापूरकर आणि प्राचार्य शिवराय अडिवतोट उपस्थित होते.
या कार्यशाळेचे स्वागत व सूत्रसंचालन डॉ. शिवराय अडिवतोट यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोरी पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंकिता, वृशाली ठाणेदार तसेच मठातील सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

























