कला, वाणिज्य असो की विज्ञान शाखेतील ९० टक्के गुण मिळालेला विद्यार्थी एकेकाळी ‘डीएड’लाच प्रवेश घ्यायचा. पण, इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल आणि शिक्षक भरतीस विलंब, पटसंख्येअभावी अतिरिक्तची भीती, अशा विविध कारणांमुळे ‘डीएड’कडील कल कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी न मिळाल्याने ११ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ५८ डीएड महाविद्यालयांना टाळे लावावे लागले आहे. इयत्ता बारावीनंतर डीएड करण्यासाठी एकेकाळी अक्षरश: दोन ते अडीच लाखांचे डोनेशन घेतले जात होते. पण, आता अनेक महाविद्यालयात नि:शुल्क प्रवेश असतानादेखील विद्यार्थी मिळत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यात २०१०-११मध्ये तब्बल ८६ अध्यापक महाविद्यालये (डीएड) होती. मात्र, सध्या एकही शासकीय अध्यापक विद्यालय सुरू नसून सहा अनुदानित तर २२ खासगी अध्यापक विद्यालये सुरू आहेत.अनुदानित महाविद्यालयांमध्ये शुल्क नसल्याने ८० ते ८५ टक्के प्रवेश आहेत. दुसरीकडे मात्र खासगी अध्यापक महाविद्यालयांमध्ये ४० ते ६० टक्के प्रवेश रिक्त आहेत. आगामी काळात त्यातील काही महाविद्यालये बंद होतील, अशी सद्य:स्थिती आहे.
जिल्ह्यातील बीएड, एमएड महाविद्यालयांचीही अशीच स्थिती आहे. नोकरीची शाश्वती नाही, वर्षानुवर्षे वाट पाहूनही नोकरी मिळत नसल्याने अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेण्यापेक्षा युवक सध्या स्वयंरोज