साडेआठ वर्षानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक ‘एक’ची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी जिल्ह्यातील २९ पतसंस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या निवडणुकीचाही समावेश आहे.या पतसंस्थेची यापूर्वीची निवडणूक एप्रिल २०१५ मध्ये झाली होती.
कोरोनामुळे विद्यमान संचालकांना सुमारे साडेतीन वर्षे मुदतवाढ मिळाली. आता जिल्हा उपनिबंधकांनी या पतसंस्थेचीही निवडणूक जाहीर केली आहे. २५ जानेवारीला पतसंस्थेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून २ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविल्या.त्या हरकतींवर ८ फेब्रुवारीला (गुरुवारी) निर्णय होईल. १३ फेब्रुवारी रोजी पतसंस्थेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर मतदानाचा कार्यक्रम जाहीर होईल. दरम्यान, विद्यमान संचालकांचे कामकाज पाहता त्यांचेच पारडे जड असल्याची सद्य:स्थिती आहे. निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांविरुद्ध कोणाचा पॅनेल असणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल.