गुरुनानक चौकातील सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा २९ फेब्रुवारीपूर्वी उरकला जाणार आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. उद्घाटनाची तयारी तातडीने व्हावी म्हणून मुंबईतील कोविड सेंटरमधून आठ आयसीयू बेड, ६० सलाईन स्टॅण्ड, आयसीयू बेडचे मॉनिटर, असे साहित्य सोलापूर जिल्हा रुग्णालयासाठी आणले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सोलापूर जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उरकण्याची लगबग सध्या सुरू आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर लगेचच ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन पाइपलाइन, लिफ्ट, खाटा ठेवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे. रुग्णालयाच्या लोकार्पणापूर्वी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.जिल्हा रुग्णालय १०० खाटांचे आणि महिला व शिशू रुग्णालय १०० खाटांचे असून सध्या दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी ९० खाटा ठेवल्या आहेत. वास्तविक पाहता दोन्ही रुग्णालयात जास्तीत जास्त प्रत्येकी १४० खाटा बसतील, अशी व्यवस्था आहे.
दरम्यान, सध्या रुग्णालयातील ओपीडी सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असून दोन्ही रूग्णालयात जवळपास आठ लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. पदभरतीची प्रक्रिया सुरू असून लोकार्पणानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. पण, तूर्तास दुसरीकडील काही वैद्यकीय तज्ज्ञ, नव्याने भरलेले डॉक्टर, बाह्य यंत्रणेद्वारे भरलेल्या मनुष्यबळावर दोन्ही रुग्णालयांचे कामकाज चालेल, असे सूत्रांनी सांगितले. विरोधक नावे ठेवणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे.