आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्ह्यात दीड- पावणेदोन वर्षांपूर्वी आलेल्या ३३ शिक्षकांना नियुक्ती मिळेपर्यंत दररोज मुख्यालयात स्वाक्षरी करावी लागली. त्यांनी जवळपास तीन महिने स्वाक्षरी केल्या, पण पावणेदोन वर्षानंतरही त्यांना पगार मिळालेला नाही. स्वाक्षरी केलेली नोंदवहीच गहाळ झाल्याने आता या प्रकरणी पोलिसांत फिर्याद देणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले.
तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कार्यकाळात आंतरजिल्हा बदलीतून आलेले ते ३३ शिक्षक आहेत. त्या सर्वांना आता जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांवर नेमणूक मिळाली. पण, सुरवातीच्या काळात मुख्यालयात स्वाक्षरी केलेल्या तीन महिन्यांचा पगार अजूनपर्यंत मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वाक्षरी केल्याचे रजिस्टर शोधण्याचे आदेश झाले, कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील सर्व कपाटांमधील कागदपत्रे शोधली. मात्र, ते रजिस्टर मिळालेच नाही. त्यामुळे रजिस्टर नेमके गेले कोठे, त्या काळात तो टेबल कोण सांभाळत होते याचा शोध घेतला जात आहे.