शासकीय कार्यालयांत घेतली जाणारी लाच आणि कुणी यासंबंधी तक्रार केलीच तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कारवायांची महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता २०२३ मध्ये अशा लाचखोरीच्या प्रकरणांत पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात या वर्षभरात लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीने जे सापळे लावले अशा एकूण ३२ प्रकरणांतील २५ जण चक्क सरकारी कार्यालयातच लाच घेताना या जाळ्यात अडकले आहेत. याच काळात पुण्यात ६२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांत विशेष पोलिस, महसूल, नागरी सुविधा पुरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, पाटबंधारे किंवा जलसंधारण विभाग यांसारख्या विभागांत सामान्य माणसाचा विविध कामानिमित्त किंवा प्रमाणपत्रांसाठी सतत राबता असतो.
शिवाय काही कार्यालयांत लाभाच्या सरकारी योजनांसाठी सामान्य माणूस सतत खेटा घालत असतो. या लोकांची कामे करून देण्यासाठी अनेकदा शासकीय कर्मचारी लाच घेतात. परंतु, यासंबंधी थेट तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मोजकीच प्रकरणे समोर येतात. दरम्यान, २०२३ या संपूर्ण वर्षभराच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यात १५, सांगली २० तर कोल्हापुरात २३ जणांविरुद्ध कार्यवाही केली आहे. सोलापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०२३ या वर्षात एकूण ३२ जणांना अशा प्रकरणात रंगेहाथ पकडले. यात वर्ग-२ दर्जाचे ६, वर्ग-३ दर्जाचे २४ तर वर्ग-४च्या २ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कुणी अधिकारी-कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर सोलापुरातील रंगभवन चौकात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात थेट संपर्क साधून तक्रार करता येईल. शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कुणी अधिकारी-कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर सोलापुरातील रंगभवन चौकात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात थेट संपर्क साधून तक्रार करता येईल. शिवाय या विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार करण्याचीही सुविधा आहे. अशा कारवाईत तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाते. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार देणे आवश्यक असल्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.