सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील चोपडी गावचे सुपुत्र सुयश शंकर बाबर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MES-2023) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD ) सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) पदावर निवड झाली आहे.
सुयश बाबर यांचे प्राथमिक शिक्षण गणेशनगर चोपडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोपडी येथे, बारावी पर्यंतचे शिक्षण आबासाहेब खेबुडकर ज्युनिअर कॉलेज आटपाडी येथे आणि अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी (पुणे) येथे पूर्ण केले.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना सुयश बाबर यांनी केवळ MES परीक्षेतच नव्हे, तर विविध स्पर्धा परीक्षांमधून आणखी चार पदांवर यश मिळवले आहे. पुणे विभागातील जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद, जिल्हा परिषद सांगलीमध्ये कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद यांसह सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर सध्या ते कार्यरत आहेत.(PWD )
स्पर्धा परीक्षेत यशासाठी सुयश यांना वडील एस. बी. बाबर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. एस. बी. बाबर सर हे बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चोपडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
सुयश बाबर यांच्या यशाबद्दल त्यांच्या गावातून, तालुक्यातून तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.