सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या औचित्याने प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य, शिक्षण व मानवसेवेच्या क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विद्यापीठाच्यावतीने त्यांना ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम ५१ हजार रुपये असे स्वरूप असणार आहे. अहिल्यारत्न पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.
नामविस्तार दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळा शुक्रवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर असतील. प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची उपस्थिती लाभणार आहे. प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय, दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, लोकवादन, ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन, विशेष व्याख्यान, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : जीवन आणि कार्य’ या विषयावरील निबंध स्पर्धा, लोककला सादरीकरण तसेच वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांद्वारे विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेला, सामाजिक बांधिलकीला आणि सांस्कृतिक मूल्यांना अधोरेखित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्व, सेवाभाव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या वतीने सर्व मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी व नागरिकांना या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. केदारनाथ काळवणे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.


























