पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची आगामी सत्र परीक्षा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. एकूण ५० ते ५५ दिवस ही परीक्षा चालणार असून पहिल्यांदा पारंपारिक (बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीए, बीबीए) अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होईल. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. गुरुवारी (ता. ८) त्यासंदर्भात परीक्षा मंडळाची बैठक होणार आहे.
विद्यापीठाची मागील सत्र परीक्षा १९ जानेवारीला संपली असून आतापर्यंत ६० टक्के अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. अभियांत्रिकीचे राहिलेले निकालही पुढील आठवड्यात लागणार आहेत. यंदा निकाल वेळेत लागावेत म्हणून परीक्षा नियंत्रक डॉ. मलिक रोकडे यांनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित नियोजन केले. पारंपारिक अभ्यासक्रमाचे पदवीच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तर सर्व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसह अभियांत्रिकी, एमबीए, शिक्षणशास्त्र, लॉ, फार्मसीच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रिन पद्धतीने तपासण्यात येत आहेत. त्यामुळे निकाल वेळेत लागण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे पुढील सत्र परीक्षेची तयारी आता विद्यापीठाने सुरू केली आहे. मार्चमध्ये सुरू झालेली सत्र परीक्षा मेमध्ये संपेल. त्यानंतर निकाल जूनपर्यंत जाहीर करून आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात जून-जुलैमध्ये होईल, यादृष्टीने विद्यापीठाची तयारी आहे.