नायगांव : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड अंतर्गत नायगाव तालुक्यातील मरवाळी तांडा येथील बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक आश्रम शाळेत एक दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक न्याय विभागा च्या मार्गदर्शक सूचनेनुसार विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात खेळाची आवड निर्माण व्हावी, आरोग्य सुदृढ राहावे तसेच शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने दि. १७ जानेवारी रोजी शनिवारी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य विजय कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रतन लक्ष्मण राठोड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गडगा केंद्राचे केंद्रप्रमुख कपिल गारटे, सेवानिवृत्त प्राचार्य किशन रतन राठोड,पी. के.पाटील,मोरे सर, आनंद राव नकाते, महादवाड सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक विभागाचे संगीतशिक्षक माधव वाघमारे व त्यांच्या संचाने सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष रतन राठोड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त प्राचार्य किशन राठोड यांचा सत्कार प्रा. हेमंत बावणे यांनी केला. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव नकाते यांचा सत्कार आनंदराव सूर्यवंशी यांनी केला, तर महादवाड सरांचा यांचा सत्कार सूर्यकांत जाधव यांनी केला.
प्रास्ताविकात प्राचार्य विजय कुमार देशमुख यांनी सांगितले की, या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आठ आश्रम शाळांतील १४, व १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यां चे व्हॉलीबॉल, कबड्डी,खो- खो या सांघिक खेळां मध्ये आठ शाळेतील एकुण ४७ संघ सहभाग घेतला आहे. सर्व खेळाडूंनी आपली क्रीडा वृत्ती जपत, सांघिक भावना जोपासत उत्तम खेळाचे प्रदर्शन करावे व यशाची शिखरे गाठावीत, असे मार्गदर्शन त्यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी “बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित” माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पोस्ट बेसिक ज्युनिअर कॉ. व उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकवर्ग तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

























