कुर्डुवाडी – माढा तालुक्यातील कुर्डुवाडी शहर राममय झाले. श्रीरामनवमीच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने सप्ताहभर संगीतमय रामकथा आयोजित केली. पंचक्रोशीत अवघा परिसर ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने गुंजला.
शहरात रोज संगीतमय रामकथा व महाप्रसादाचे आयोजन झाले. रामभक्तांनी सढळ हाताने मदत केली; काहींनी संपूर्ण प्रसाद पंक्तीचा खर्च उचलला. कुर्डुवाडीकर चांगल्या कामांना नेहमीच साथ देतात.
मोटारसायकल रॅलीने शहर श्रीराममय
टेंभुर्णी रोडवरील गावदेवी मंदिरापासून रेल्वे कॉलनीतील श्रीराम मंदिरापर्यंत मोटारसायकल रॅली काढली गेली. हजारो तरुणांनी भगवी टोपी, श्रीराम पंचा व भगवे झेंडे लावून जयघोष केला.
मंदिरात रामजन्मोत्सव
हिंदू देवालय संस्थेच्या श्रीराम मंदिराला फुलांची सजावट व आकर्षक रोषणाई झाली. गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत कीर्तन, भजन व प्रवचने झाली. सकाळी १० वाजता नारदीय कीर्तन, दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी रामजन्मोत्सव व प्रवचन झाले. भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी केली होती.

























