सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर काल पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा ह्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायुडू चषकातील चौथ्या फेरीच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने पहिल्या डावात 103 षटकात 4 बाद 403 धावा केल्या असून 194 धावांची आघाडी घेतली आहे.
सकाळच्या सत्रात कालची नाबाद जोडी हर्ष मोगावीरा आणि अनिरुद्ध साबळे यांनी प्रथम अर्धशतकी आणि मग संयमी फलंदाजी करत शतकी सलामी दिली. दोघांनी त्रिपुराचीगोलंदाजी निष्प्रभ करत जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 48 षटकात 165 धावा केल्या, तेंव्हा हर्ष 77 तर अनिरुद्ध 83 धावांवर नाबाद होते. जेवणानंतर 4 षटकात दोघेही चौकार षटकार लगावत नव्वदीच्या घरात पोचले पण त्रिपुराच्या अमित अली ने त्याच्या लागोपाठच्या षटकात प्रथम अनिरुद्ध साबळे (91 धावा, 162 चेंडू, 12 चौकार) याला आनंध भौमिक द्वारे व हर्ष मोगावीरा (95 धावा, 159 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार) याला यष्टिरक्षक दीपजोय कडे झेल देण्यास भाग पाडून जोडी फोडली व त्यामुळे दोघांचेही शतक थोडक्यात हुकले.
त्यानंतर आलेला कर्णधार सचिन धस आणि भरवशाचा फलंदाज दिग्विजय पाटील यांनी उपयुक्त अशी संयमी फलंदाजी करत चहापानाला खेळ थांबला तेंव्हा 2 बाद 290 धावा केल्या.
शेवटच्या सत्रात धावफलक हलता ठेवत 105 धावांची भागीदारी रचली. त्यात दोघांनीही आपापली अर्धशतके साजरी केली. पण 299 धावा झाल्या असताना पुन्हा एकदा अमित अली याने सचिनला त्रिफळाचित करत सलग तिसरा बळी मिळवला. सचिनने 93 चेंडू मध्ये 4 चौकार, 2 षटकार सह 54 धावा केल्या.
त्यानंतर दिग्विजय याने साहिल पारख याचे सोबत ताबडतोब फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचत धावसंख्या 356 पर्यंत नेली, तेव्हा अर्काजीत रॉय ने साहिल याला त्रिफळा बाद केले.
त्यानंतर आलेल्या किरण चोरमले सोबत दिग्विजय याने अतिशय उत्तम फलंदाजी करत 9 चौकार, 3 षटकार लगावत नवीन वर्षात पहिले शतक साजरे केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा पहिल्या डावात महाराष्ट्र संघाने 194 धावांची आघाडी घेतली असून दिग्विजय 112 वर तर किरण 29 वर नाबाद असून उद्या नाबाद जोडी व उर्वरित फलंदाज आणखी किती धावा जोडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून जास्तीत धावा करून एक भक्कम धावसंख्या उभा करण्याचे संघाचे उद्दिष्ट्य असल्याचे दिसून येते.


























