बिलोली – रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन यासारख्या अनेक प्रोत्साहन देणारे योजना शासन द्वारे राबविल्या जातात शेतकऱ्यांनी लाभ घेऊन उत्पादनात वाढ करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शेतकऱ्यांना केले. मंगळवार (दि.२७) रोजी सगरोळी ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, संचालक संजीव सगरोळीकर, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार इत्यादींची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यामध्ये दूध व्यवसायासाठी पूरक असे वातावरण असल्यामुळे दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय बरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा पण वापर करावा असे आवाहनही कर्डीले यांनी केले.
प्रगतशील शेतकरी व भाजीपाला उत्पादक बालाजी लोहकरे यांनी, पारंपरिक शेतीऐवजी फळ लागवड व भाजीपाला लागवड करावी. मागणी, गरज व बाजारपेठेचा अभ्यास करावा. आपल्या भागामध्ये टरबूज आणि खरबूज यासारख्या पिकाचे चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक फायदा आपल्याला घेता येतो, टोमॅटो उत्पादनामध्येही चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो असे सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ.राकेश अहिरे यांनी, एकात्मिक शेतीच्या माध्यमातून नवीन पिकाचे वान वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करून आर्थिक प्रगती करावी असे सांगितले.
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांनी, सघन कापूस लागवड करून एकात्मिक व्यवस्थापन केले केल्यास पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत २०-३०% जास्त उत्पादन मिळते, एकाच क्षेत्रात झाडांची संख्या वाढते, आणि लवकर जमीन आच्छादली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. या पद्धतीत खत व पाण्याची कार्यक्षमता वाढते त्यातून उत्पादनात वाढ होते असे संगीतले.
अध्यक्षीय समारोपात प्रमोद देशमुख यांनी, शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञान महोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. येथील क्षेत्रावर ती पाहणी करावी, कृषी विज्ञान केंद्राची वेळोवेळी मदत घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण शेती करावी व तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले. यावेळी यज्ञेश कातबने धामगाव (ता. पैठण) युवा उद्योजक रत्नाकर ढगे सायाळ (ता.लोहा) या शेतकऱ्यांना कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषीवेद युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात करण्यात आले. कार्यक्रमास दोन हजार शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

























