बार्शी – येथील यशवंत विद्यालय, खांडवी या प्रशालेची वार्षिक शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या सहलीचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याच्या कायदेमंडळाचे केंद्र असलेल्या विधानभवनाला (मुंबई) विद्यार्थ्यांनी दिलेली सदिच्छा भेट. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या प्रत्यक्ष कार्यप्रणालीचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली, लोकशाहीचे धडे प्रत्यक्ष अनुभवले.
शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीत सहभाग घेतला होता. विधानभवनाच्या भव्य वास्तूची माहिती देताना मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना विधानसभा आणि विधानपरिषद यामधील फरक, लोकप्रतिनिधींची निवड प्रक्रिया आणि कायदे बनवण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सभागृहात जाऊन आसन व्यवस्था, अध्यक्षांचे दालन आणि ऐतिहासिक गॅलरीचे दर्शन घेतले.
त्यांनी विद्यार्थ्यांना ‘आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे आधारस्तंभ आहेत,’ असे सांगत सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.
शिक्षण आणि आनंद यांचा संगम प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर शिंदे, राजेंद्र शिंदे, मांजरे सर, संतोष खोगरे, प्रमोद जाधव, राम घाडगे या शिक्षक वृंदांनी या भेटीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. विधानभवन भेटीसोबतच विद्यार्थ्यांनी मुंबईतील इतर ऐतिहासिक स्थळे आणि संग्रहालयांनाही भेट दिली.
केवळ पुस्तकातून नागरिकशास्त्र शिकण्यापेक्षा, प्रत्यक्ष विधानभवनात जाऊन तिथे होणारे कामकाज पाहिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि लोकशाहीवरची निष्ठा अधिक दृढ झाली आहे. सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे अध्यक्ष, ग्रामस्थ आणि पालकांनी कौतुक केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असून, एक अविस्मरणीय शैक्षणिक अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला आहे.


















