किनवट : केंद्र शासनाच्या “भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५–२६” अंतर्गत किनवट नगरपरिषदेच्या विकास आराखड्यातील महत्त्वाच्या विकासकामांना महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे किनवट शहराच्या नियोजनबद्ध विकासाला मोठा आधार मिळाला असून, ही मान्यता किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित असल्याचे बोलले जात आहे.
या निर्णयामध्ये मंजूर विकास आराखडा २००२ तसेच प्रस्तावित विकास आराखडा २०२२ मधील विविध विकासकामांचा समावेश आहे. यामुळे शहरातील बाजारपेठा व व्यापारी सुविधा आधुनिक स्वरूपात विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुरांचा बाजार, दुकान केंद्र व भाजीपाला मार्केटचा विकास
मंजूर विकास आराखडा २००२ नुसार आरक्षण क्रमांक १२ येथील गुरांचा बाजार तसेच आरक्षण क्रमांक १७ येथील भाजीपाला मार्केट, तर प्रस्तावित विकास आराखडा २०२२ नुसार आरक्षण क्रमांक १२ येथील दुकान केंद्र आणि आरक्षण क्रमांक १५ येथील व्यापारी संकुल व भाजीपाला मार्केट विकसित करण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या विकासकामांमुळे भाजीपाला विक्रेते, व्यापारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना नियोजनबद्ध, सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, शहरातील अव्यवस्था व वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पांसाठी वास्तुविशारद संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखड्यांना सहायक संचालक, नगर रचना विभाग, नांदेड यांची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांच्याकडून अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रत्यक्ष कामांना आता गती मिळणार आहे.
आमदार भीमराव केराम यांचे स्पष्ट मत
या संदर्भात आमदार भीमराव केराम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“किनवट शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जरी नगरपरिषद निवडणुकीत जनतेने आम्हाला निवडून दिले नसले, तरीही जनतेसमोर जाहीरनाम्यात दिलेल्या प्रत्येक वचनासाठी आम्ही आजही बांधील आहोत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ देणार नाही. किनवट शहराला आवश्यक असलेल्या मूलभूत व व्यापारी सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राधान्य आहे.”
विकास आराखड्यातील प्रकल्पांचा समावेश व्हावा, तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांनी शासन स्तरावर तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे प्रकल्प अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
या निर्णयामुळे किनवट शहरातील व्यापारी व नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार असून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. नियोजनबद्ध बाजारपेठा व व्यापारी संकुले उभारल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून होणाऱ्या या विकासकामांमुळे किनवटच्या विकास प्रक्रियेला वेग मिळणार असून, शहराचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

























