बार्शी – आर. जी. ग्रुप युवक महोत्सवाच्यावतीने कुर्डूवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाच्या न्यू हायस्कूल (शेठ अगरचंद कुंकुलोळ हायस्कूल), बार्शी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी त्रिपुरा राज्यातील पारंपरिक लोकनृत्य ‘होजागिरी’ सादर करत आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे दर्शन घडवले. या सादरीकरणाच्या जोरावर त्यांनी उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
होजागिरी हे रेयांग (ब्रू) जमातीचे प्रसिद्ध लोकनृत्य असून संतुलन, लवचिकता आणि सौंदर्य यांचा अद्भुत संगम या नृत्यात पाहायला मिळतो. डोक्यावर मातीची भांडी ठेवून तसेच हातात दिवे सांभाळत विद्यार्थिनींनी सादर केलेले नृत्य प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक हालचाली, तालबद्ध सादरीकरण आणि भावपूर्ण अभिनयामुळे परीक्षकांनीही या सादरीकरणाचे भरभरुन कौतुक केले.
या यशामागे मार्गदर्शक शिक्षक अरविंद कोळी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, कोरिओग्राफर सौरव कांबळे यांची कलात्मक मांडणी, रुपाली मॅडम यांचे पारंपरिक व आकर्षक वेशभूषा नियोजन तसेच वेशभूषा व्यवस्थेसाठी मिळालेले सहकार्य मोलाचे ठरले.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक रावसाहेब मनगिरे आणि खजिनदार मोहन बुचडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या कलेचे आणि परिश्रमांचे कौतुक केले.















