तभा फ्लॅश न्यूज/दिल्ली : भारताने आपल्या हवाई संरक्षण क्षमतेत लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवर भारताच्या अत्याधुनिक आकाश प्राइम एअर डिफेन्स सिस्टम’ची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. चीन, पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या शत्रूराष्ट्रांना ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान प्रत्युत्तर देणाऱ्या या प्रणालीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी दरम्यान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलने उच्च वेगाने जाणाऱ्या लक्ष्यांवर दोन अचूक प्रहार केले. ही प्रणाली भविष्यात भारतीय लष्कराच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेजिमेंटमध्ये सामील होणार आहे.
DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) आणि भारतीय लष्कराच्या समन्वयाने झालेल्या या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या हवाई संरक्षण नेटवर्कमध्ये आकाश प्राइमला औपचारिकपणे सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही प्रणाली केवळ शत्रू देशांचे ड्रोन, फायटर जेट्स, आणि इतर हवाई हल्ले परतवण्यासाठी सक्षम नसून, ती स्वदेशी तंत्रज्ञानाचा सर्वोच्च नमुना देखील आहे. ‘आकाश’ डिफेन्स सिस्टीमने यापूर्वीही जम्मू-काश्मीर आणि पश्चिम सीमांवर पाकिस्तानच्या हल्ल्यांना रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल
‘आकाश प्राइम’ ही प्रणाली केवळ एक चाचणी नव्हे, तर भारताच्या स्वयंपूर्ण संरक्षणाच्या दिशेने ठोस पाऊल आहे. हवाई क्षेत्रातील सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या या सिस्टीममुळे भारत कोणत्याही हवाई धोक्याला अधिक आत्मविश्वासाने तोंड देऊ शकणार आहे.