अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरालगत बासलेगाव रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय जवळ सूरत ते चेन्नई महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता बनविण्यासाठी संबंधित कंपनीकडून नियमबाह्य अवैधरित्या सुरुंग लावून ब्लास्टींग केले जात आहे. या वाढत्या ब्लास्टींगमुळे येथील अनेक घरांना मोठे तडे गेले आहेत, तर अनेक घरांची पडझड होण्याची शक्यता आहे. आणि अनेक कुटुंबांच्या बोअरवेल मधील पाण्याची पातळी कमी झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ब्लास्टींग सुरू असताना, अनेक मोटारसायकलस्वार बासलेगाव कडे जात असताना किंवा अक्कलकोट कडे येत असताना त्यांच्या बाजूलाच ५ ते १० किलोचा भला मोठा दगड येऊन पडला. सुदैवाने तो मोटारसायकलस्वार सहपत्नीक थोडक्यात बचावले.
गेल्या दोन महिन्यांपासून ब्लास्टींगचे काम सुरू असून, कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील वसाहत मधील नागरिक व महिलांसह वयोवृद्ध व्यक्ती आणि चिमुकली मुले जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. दररोज ब्लास्टींग सुरु असताना सकाळी पासून ते संध्याकाळी पर्यंत वसाहत लगत व बासलेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड पडले. संबंधित रस्ता ठेकेदारांच्या सहकारी इंजिनिअर व कामगारांनी संगनमताने हे अवैध ब्लास्टींग मर्यादा पेक्षा जास्त उडविण्याचे कामास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तर परिसरातील मंगल कार्यालयाचे संचालक उरुजपाशा पिरजादे, नागराज कुंभार, प्रशांत गुरव, सुनील गोरे, सिध्दाराम पाटील, इनायत शेख, रमेश शिंदे, दिगंबर साळुंखे, गुरप्पा कुंभार, सुनील आळंद, अविनाश कोरे, विजयकुमार मलंग, संगमेश्वर स्वामी, सचिन डिग्गे, शशिकांत कुंभार, करेप्पा रोळ्ळी, अलका दसले, उज्वला फडतरे, विजयालक्ष्मी कुंभार यांच्या घरांना तडे गेले आहेत. सूरत ते चेन्नई सुपर रस्ता काम करणाऱ्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी येथील वसाहत मधील नागरिक व महिलांनी अनेकवेळा कंपनीसह शासन लोकप्रतिनिधींना तोंडी सांगितले आहे, आता निवेदने देण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे या अवैध ब्लास्टींग उडविण्याचे बाबतीत पोलिस निरीक्षक दीपक भिताडे यांनी सुद्धा या वसाहत मधील नागरिकांच्या तोंडी तक्रारीची दखल घेऊन ठेकेदारांच्या मुनिमास सूचना दिल्या आहेत. तरी सुद्धा त्या सूचना ची पायमल्ली केली जात आहे. म्हणून तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांनी संबंधित ठेकेदारास ब्लास्टींग उडविण्याऐवजी पर्यायी मार्ग निवडण्याची सूचना द्यावी, अशी वाढती मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून सूरत ते चेन्नई रस्ता कामकाज सुरू असून मात्र एक – दोन महिन्यांपासून दिवस व रात्र वसाहत परिसरात अवैध ब्लास्टींग उडविण्याचे कामास सुरुवात केली आहे. याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तरी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अवैध ब्लास्टींग उडविण्याचे कामास पायबंद घालण्यासाठी सूचना द्यावी, अन्यथा या परिसरातील श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या वतीने नागरिकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
माझी शेती सूरत ते चेन्नई महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहे. या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग घेत असल्याने धुळीमुळे पीकांचे नुकसान होत आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून दोन एकर शेतजमीन मध्ये पावसाचे पाणी थांबले आहे. सदर नुकसान कंपनीने भरून द्यावे, याबाबत कंपनीकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
– अहमदपाशा पिरजादे शेतकरी, नागनहळ्ळी.























