सोलापूर – एका सार्वजनिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर उभे राहून मुख्यमंत्री यांच्या पत्नीविरोधात अत्यंत अश्लील, अमानुष व बलात्कारास चिथावणी देणारे वक्तव्य करण्यात आले. त्यावर उपस्थितांकडून टाळ्या व पैशांची उधळण करण्यात आली, ही बाब समाजाच्या नैतिक अधःपतनाचे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या गंभीर उल्लंघनाचे द्योतक आहे. महिलांवरील हिंसाचारास चिथावणी देणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर यांच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अशा प्रकारचे वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे, सामाजिक सलोखा बिघडवणारे तसेच भारतीय संविधान व कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहिता व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या वेळी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला आघाडी अध्यक्षा रंजिता चाकोते, प्रदेश सचिव अर्चना वडनाल, अश्विनी चव्हाण, सुनीता कामठी, ममता कुलकर्णी, मंजिरी अंत्रोळीकर, अंजली मशाळकर व रुपा कुटाटे उपस्थित होत्या.


























