पंढरपूर – जीवघेण्या नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाचे उत्पादन, साठा,विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दीपक इरकल यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच सोलापूर जिल्ह्यामध्ये पतंगबाजीचा उत्साह वाढत आहे व दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिबंधित ‘नायलॉन मांजा’ (चायनीज मांजा) छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे समोर येत आहे. हा मांजा केवळ पक्ष्यांसाठीच नव्हे, तर मानवी जीवनासाठी ‘यमपाश’ ठरत असून,शासनाने यावर कडक बंदी घातली आहे.
हा नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा हा काचेचा थर आणि रसायने वापरून बनवला जातो. हा धागा सहजासहजी तुटत नाही. दुचाकीस्वार,पादचारी रस्त्यावरून जात असताना हवेत लटकणारा हा मांजा गळ्याला स्पर्श केल्यास धारदार शस्त्राप्रमाणे त्वचा आणि श्वासनलिका कापली जाते. गेल्या काही वर्षांत अशा अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत.
पतंग कटल्यानंतर हा मांजा झाडांच्या फांद्यांमध्ये किंवा विजेच्या तारांमध्ये अडकून पडतो. यामध्ये अडकल्यामुळे घारी,कबुतरे आणि चिमण्यांचे त्याचबरोबर अनेक दुर्मिळ पक्षांचे पंख कापले जातात. अनेक वेळा पक्षी या मांजात अडकून तडफडून मरतात. हा मांजा निसर्गात विरघळत नसल्याने तो अनेक वर्षे अपघातांना निमंत्रण देतराहतो.
राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) आदेशानुसार नायलॉन मांजाची निर्मिती,विक्री आणि साठवणुकीवर संपूर्ण बंदी आहे.पोलीस प्रशासन आणि
नगरपालिका,महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी छापे टाकले जावेत व नायलॉन मांजा विकताना किंवा वापरताना आढळल्यास संबंधित व्यक्तींवर इतरांचा जीव धोक्यात येईल असे कृत्य करणे,पर्यावरण संरक्षण कायदा,वन्यजीव संरक्षण कायद्यामधील विविध तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शशिकांत हरिदास,जिल्हा सचिव सुहास निकते यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडेही लेखी पत्राद्वारे केली आहे.
———————-
ग्राहक पंचायतीचे आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, पतंग उडवण्यासाठी फक्त साध्या सुती धाग्याचा/मांज्याचा वापर करा.तसेच नायलॉन मांजा विकणाऱ्यांची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला द्या.दुचाकी चालवताना गळ्याभोवती मफलर बांधा किंवा हेल्मेटचा वापर करा.
( लहान मुलांना नायलॉन मांजापासून दूर ठेवा )
आपल्या आनंदासाठी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये याचे भान प्रत्येक नागरिकाने राखावे असे आवाहन ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य विनोद भरते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव महेश भोसले उपाध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले आहे.

























