अमरावती 11 ऑगस्ट (हिं.स.)
मेळघाटातील सूसर्दा वनपरिक्षेत्रात सागवान तस्करी शनिवारी उघड झाली आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून फरार तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
सुसर्दा वनपरिक्षेत्रातील बिबामल वर्तुळात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक प्रकरणात भारतीय वनअधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या राखीव वनखंडात सागवान तस्करांच्या टोळीने अवैध मार्गाने प्रवेश करुन सागवान झाडे तोडली. या लाकडाची मध्यप्रदेश राज्यातील बर्हाणपूर येथे तस्करी करण्यात आली आहे. तपासादरम्यान अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वनगुन्ह्यातील आरोपी सचिन भागसिंग पटोरकर (रा. बिबामल), चेतन चंपालाल जावरे (रा. खारी), सरताप दशरथ भामर (रा. भवर) नुकदार भवरसिंघ अहिर्या (रा. भवर, राधे मोरे (रा. घाकबारा, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
दुनियासिंघ मोरेय (रा. चाकबारा), महेश पासि (रा. बाटा), अंकित पासि (रा. चाकबारा) हे तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन भागसिंग पटोरकर याला धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अग्रिम सैनी यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आयुष कृष्णा, वन परिक्षेत्र अधिकारी पी. जी. सातारकर आणि पथकाने केली आहे.