तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : अमेरिकेतील नामांकित इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला (Tesla) ने भारतातील आपल्या प्रवासाची दमदार सुरुवात केली असून, मुंबईमध्ये 15 जुलै 2025 रोजी पहिलं अधिकृत शोरूम आणि अनुभव केंद्र सुरू केलं. बीकेसीमधील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे फक्त एक शोरूम नाही, तर एक मोठा संदेश आहे की टेस्ला (Tesla) भारतात आली आहे. तीही योग्य वेळी आणि योग्य शहरात. मुंबई ही भारताची केवळ आर्थिक राजधानी नाही, तर नावीन्य आणि स्टार्टअप्सची, उद्यमशीलतेची राजधानी आहे.”
टेस्लाची भारतात पहिली कार Model Y SUV – आधीच लॉन्च करण्यात आली आहे. सुरुवातीला या गाड्या CBU (Completely Built Unit) स्वरूपात म्हणजे परदेशातून पूर्णपणे तयार करून आयात केल्या जाणार आहेत. सप्टेंबर 2025 पासून या गाड्यांच्या डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीने सध्या मुंबईत पहिलं स्टोर सुरू केलं असून, पुढील काही महिन्यांत दिल्लीत दुसऱ्या शोरूमचे उद्घाटन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेस्लाचा हा भारतीय बाजारातला प्रवेश केवळ कार विक्रीपुरता मर्यादित न राहता, इलेक्ट्रिक वाहनांसाठीची बाजारपेठ विस्तारण्यात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.