सोलापूर – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त प्रिसिजन कंपनीत ४ ते १० मार्च दरम्यान ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. “Engage, Educate & Empower People to Enhance Safety” (सुरक्षितता वाढविण्यासाठी लोकांचा सहभाग, शिक्षण आणि सक्षमता) या वर्षीच्या थीमनुसार कंपनीत आठवडाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सुरक्षा सप्ताहाच्या प्रारंभी कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा शपथ घेऊन काम करताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची प्रतिज्ञा केली. उद्योगसमूहात कर्मचारी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या आरोग्य व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी तसेच अपघातमुक्त कामकाजाचे वातावरण निर्माण करण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक सुहास पाटील यांनी कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरण संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कामाच्या ठिकाणी वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) योग्य व नियमित वापर करण्याचे महत्त्व त्यांनी कर्मचाऱ्यांना पटवून दिले. सुरक्षा विषयक माहिती तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उद्दिष्ट याबाबत अमित पाटील यांनी कर्मचाऱ्यांना माहिती दिली. एचआर विभागाचे सरव्यवस्थापक राजकुमार काशीद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुरक्षित कामकाजाची सवय ही उद्योगाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
सुरक्षा सप्ताहानिमित्त कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरक्षा घोषवाक्य स्पर्धा, सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा कविता स्पर्धा तसेच सुरक्षा विषयक प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याशिवाय कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनांचा वापर का आवश्यक आहे आणि निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांचे परिणाम काय असू शकतात याचे प्रभावी सादरीकरण करणारी लघुनाटिका देखील सादर करण्यात आली.
सप्ताहादरम्यान कंपनीच्या विविध विभागांमध्ये सुरक्षा साधनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अग्निसुरक्षा उपकरणे, वैयक्तिक सुरक्षा साधने तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच कंपनीतील सर्व वाहनचालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेऊन रोड सेफ्टी, वाहतूक नियमांचे पालन तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा मुख्य उद्देश औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करणे, कामाच्या ठिकाणी होणारे अपघात कमी करणे तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित कामकाजाची सवय निर्माण करणे हा आहे. या उपक्रमातून कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले.
या कार्यक्रमास कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























