सोलापूर – शहरात भर दुपारी कोसळलेल्या स्वाती नक्षत्राच्या पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला तसेच शुक्रवारी दुपारनंतर देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारपासून शहर जिल्हा परिसरात पावसाची दमदार हजेरी लागलेली दिसत आहे.
दरम्यान, नवरात्राच्या काळात सोलापूर शहर जिल्ह्यात दुरुस्ती झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकासहित जमीन खरडून गेल्याने शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. अशातच पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंताक्रांत बनलेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान देखील ३८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत होता. दिवाळीच्या सणामध्ये थंडीचा हंगाम सुरू होतो. परंतु परतीच्या पावसाचा जोर अजून कायम आहे. आणखीन चार दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
शुक्रवारी सकाळी ढग दाटून आले होते. काही काळानंतर सर्वत्र लख्ख प्रकाश पडला होता. परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा आभाळ येऊन जोरदार पावसाची हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र दिसून आले.


















