तामसा – जांभळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम तीन वर्षानंतरही पूर्ण झाले नसल्याच्या व बांधकामाचा दर्जा ढासळल्याच्या तक्रारी वाढल्या असून दवाखाना बांधकामाची तात्काळ चौकशी करावी. संबंधित गुत्तेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी. अशी मागणी पशुपालकातून पुढे आली असून दवाखान्याच्या अर्धवट बांधकामामुळे पशुपालकांचे हाल होत आहेत.
हदगाव तालुक्यातील आदिवासीबहुल कृष्णापूर, रावणगाव, डाक्याचीवाडी, धन्याचीवाडी, शेंदण, राळावाडी, ठाकरवाडी गावच्या पशूंचे आरोग्य सांभाळणाऱ्या जांभळा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – 2 च्या नवीन इमारतीसाठी शासनाने जिल्हा वार्षिक योजना – आदिवासी उपयोजना 2022 – 23 अंतर्गत सुमारे 43 लाख रुपयाचा निधी मंजूर करूनही बांधकाम होत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने संबंधित गुत्तेदाराने इमारतीचे बांधकाम केले. मात्र दवाखान्यातील बरीच कामे अर्धवट ठेवून ईमारतीची रंगरंगोटी करून गुत्तेदार मोकळे झाले. सध्या रंगरंगोटीला ‘काळे डाग’ पडल्याने ईमारत नवी की जुनी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नूतन ईमारत आजूनही दवाखाना यंत्रणेला सुपूर्त केली नसल्याने दवाखाना कुलूपबंदच असल्याचे सांगण्यात येते. प्रस्तुत ईमारत बांधकामाला 13 मार्च 2023 ला प्रशासकीय मान्यता व 28 एप्रिल 2023 ला तांत्रिक मान्यता मिळाली होती. बांधकाम कालावधी बारा महिन्याचा होता. नूतन दवाखान्यात अद्यावत सोयी सुविधा देण्याची तरतूद अंदाजपत्रकात होती. परंतु दवाखाना बांधकामात अंदाजपत्रकाचा दूरदूरचा संबंध जुळत नसल्याने शासनाचे 43 लाख रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसते. सुशोभीकरण, पाणी, विद्युतीकरण, फर्निचर, औषधालय, लॅब, डॉक्टरांसाठी कॅबिन, स्टोअर रुम, वेटींग हॉल, संडास, बाथरूम अशी तरतूद असताना बरीच कामे अर्धवट सोडल्याचे पशुधन पर्यवेक्षकांनी सांगितले. संबंधित विभागाने बांधकाम पूर्ण न करता बांधकामाची बिलं डोळ्यावर पट्टी बांधून दिले काय ? असा संतप्त सवाल पशुपालकातून विचारला जातो.
संबंधितांनी जांभळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अर्धवट बांधकामाची चौकशी करून गुत्तेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पशुपालकातून पुढे आली असून निदान चालू वर्षात तरी दवाखान्याचे काम पूर्ण होईल का? असा प्रश्न जांभळेकरांना पडला आहे.
























