अक्कलकोट – येथील बस स्थानकात धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा नाहक त्रास हजारो प्रवाशांना दररोज सोसावा लागत आहे. अक्कलकोटच्या बस स्थानकात निर्माण होणाऱ्या धुळीकडे अक्कलकोट बस आगार प्रमुख कधी लक्ष देणार अशी विचारणा प्रवासी वर्गातून केली जात आहे.
अक्कलकोट बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी हे प्रवास करतात. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त हे बस द्वारे येत असतात. तसेच अक्कलकोट शहर तालुक्यातून दररोज हजारो प्रवासी हे परगावी जात असतात. अशा गजबजलेल्या अक्कलकोट बस स्थानकात धुळीमुळे प्रवासी वर्गांचे अतोनात हाल होत आहेत. वयोवृद्ध तसेच महिलावर्ग , विद्यार्थी , परगावचे भाविक यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. बस स्थानकातील धुळीमधूनच प्रवाशांना जावे लागत आहे. अक्कलकोट बस स्थानकातील धुळीबाबत आगार प्रमुखांना काहीच देणे लागत नसल्याचे दिसत आहे. बस स्थानकातील धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी फवारण्याचे साधे काम हे राज्य परिवहन महामंडळाकडून होत नसल्याबद्दल हजारो प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अक्कलकोट बस स्थानकाला भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. सध्या अक्कलकोट बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे काम सुरू आहे. हे काम आणखीन काही महिने चालणार आहे. पण तोपर्यंत अक्कलकोट बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सोयी देणे हे राज्य परिवहन महामंडळाचे काम आहे. केवळ नवीन इमारत निर्माण होत आहे हे किती दिवस सांगणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अक्कलकोट बस स्थानकातील धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी परगावच्या तसेच स्थानिक प्रवासी वर्गातून केली जात आहे.

























