महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेक नेते येतात आणि जातात, पण खेळाडूंच्या गळ्यातील ताईत होण्याचं भाग्य फार कमी जणांना लाभतं. सत्तेच्या वर्तुळात वावरणारा एक कडक शिस्तीचा प्रशासक जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा तो केवळ एक राजकारणी नसून हजारो खेळाडूंचा ‘पालक’ असतो, हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं.
विमान अपघातात अजितदादांचे निधन झाले. आज दादा आपल्यात नाहीत, ही कल्पनाच क्रीडा विश्वाला सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा एक सुवर्ण अध्याय काळाच्या पडद्याआड गेला. खेळाडू आणि विविध क्रीडा संघटना यांच्या मागे ताकदीने उभा राहणारा खो-खो प्रेमींचा ‘पालक’ हरवला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा २००६ मध्ये अजितदादांनी सांभाळली. तब्बल १२ वर्षे त्यांनी खो-खोला केवळ एका खेळाचे स्वरूप न देता, त्याला एक सन्मान मिळवून दिला. नियमानुसार जेव्हा ‘कुलिंग पिरियड’ आला, तेव्हा खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदावरून ते बाजूला झाले. अनेक संघटनांनी त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारा अशी विनंती केली. मात्र, दादांचं प्रेम मातीतील खेळांवर होतं. त्यांनी महाराष्ट्र कबड्डी असेसिएशनची जबाबदारी स्वीकारली. खो-खो आणि कबड्डी यासारख्या खेळांना ग्लॅमर आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात दादांचा सिंहाचा वाटा राहिला, म्हणूनच त्यांना या खेळांचे ‘भाग्यविधाता’ मानले जाते. २०१२ च्या काळात खो-खो खेळाचा पोलीस गेम्स मध्ये समावेश नव्हता. खेळाडूंची ही समस्या
महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दादांच्या पुढे मांडली आणि त्यांनी विलंब न लावता पाठपुरावा करून खो-खोचा समावेश पोलीस गेम्समध्ये करवून घेतला. त्यामुळं शेकडो खो-खो खेळाडू पोलीस गणवेशात अभिमानाने वावरत आहेत, त्यांच पुण्य दादांना जातं.
२०१३ मध्ये ऊर्जामंत्री असताना त्यांनी महावितरणमधील भरतीचे दरवाजे खेळाडूंसाठी उघडले. त्या एका निर्णयामुळे ६० खेळाडूंच्या आयुष्याचं सोनं झालं, ज्यात जवळपास ५२ खेळाडू केवळ खो-खोचे होते. ही त्यांची खेळाप्रती असलेली तळमळ होती. नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेतही त्यांनी विशेष लक्ष घातल्याने विविध खेळातील प्रावीण्य प्राप्त जवळपास पावणेदोनशे खेळाडूंना क्रीडा खात्यात नियुक्ती देण्यात आली, ज्यात खो-खोच्या ३८ खेळाडूंचा समावेश आहे.
निधीची कमतरता कधीच पडू दिली नाही
भाई नेरुरकर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे श्रेय पूर्णतः दादांना जाते. २०१२ मध्ये या स्पर्धेसाठी १९ लाखांची तरतूद केली. त्यानंतर २०२५ मध्ये या स्पर्धेची तरतूद १ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं धाडस फक्त दादाच करू शकले. खो-खो असो, कबड्डी असो वा कुस्ती, खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत त्यांनी कधीही आखडता हात घेतला नाही. खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्समधील विजेत्यांना ७ लाख, ५ लाख अशा मोठ्या रकमेची राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहनपर मदत देऊन त्यांनी खेळाडूंची जिद्द जिवंत ठेवली. त ठेवली,
अपूर्ण राहिलेलं ‘ऑलिम्पिक भवन’चं स्वप्न
महाराष्ट्रात एक जागतिक दर्जाचं ‘ऑलिम्पिक भवन’ असावं, हे दादांचं स्वप्न होतं. सत्तेत आल्यावर त्यांनी क्रीडा खाते आपल्या पक्षाचे आमदार संजय बनसोडे यांच्यावर क्रीडामंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या माध्यमातून बालेवाडीत जागा उपलब्ध करून दिली आणि ७५ कोटींचा निधी मंजूर केला. आज या वास्तूचं काम अर्ध्याहून अधिक पूर्ण झालं आहे. पण नियतीचा खेळ बघा, ज्या माणसाने हे स्वप्न पाहिलं, ज्यांनी विटामातीचं हे मंदिर उभं करण्यासाठी कष्ट घेतले, ते दादा मात्र उद्घाटनाला नसतील. ही खंत आज प्रत्येक क्रीडा कार्यकर्त्याच्या मनात सलत आहे.
जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा ठसा
२०२५ मध्ये दिल्लीत झालेली ‘वर्ल्ड कप खो-खो स्पर्धा असो वा महाराष्ट्रात सुरू झालेल्या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, दादांनी नेहमीच खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. दिल्लीतील स्पर्धेसाठी त्यांनी परराज्यात असूनही स्पर्धा आयोजित करण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, हे केवळ खेळावरील प्रेमापोटीच शक्य होतं.
शेवटची एक्झिट आणि एक कायमची पोकळी
बालेवाडीत ‘कॉमनवेल्थ खो-खो चॅम्पियनशिप’ घेण्याचे त्यांचे नियोजन सुरू होते. त्यासंदर्भात चार बैठकाही झाल्या होत्या. पण ही स्पर्धा प्रत्यक्षात येण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. एका दुर्दैवी विमान अपघाताने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा सूर्य मावळला.
दादा गेले, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा, त्यांनी दिलेला नोकऱ्यांचा आधार आणि खेळाडूंप्रती असलेली त्यांची संवेदना नेहमीच जिवंत राहील. आज महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि राज्यातील प्रत्येक खेळाडू पोरका झाला आहे. समस्या सोडवण्यासाठी ताकदीने उभा राहणारा महाराष्ट्र खो-खो संघटनेचा ‘पालक’ हरवला आहे. क्रीडा क्षेत्राला बळ देणारा असा नेता, असं नेतृत्व पुन्हा होणे नाही. आदरणीय अजितदादा, तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून महाराष्ट्राच्या या खेळाडूसह आम्हा क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना असाच आशीर्वाद देत राहा. तुमच्या स्वप्नातील बलशाली क्रीडा महाराष्ट्र घडवणे हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल.


















