देगलूर – तालुक्यातील खानापूर येथील इंदिरा आवास नगर परिसरात बेकायदेशीर व बिनापरवानगी शिंदी व दारूची विक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रसायनमिश्रित शिंदीची विक्री जोमात सुरू असून, त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परवानगीशिवाय सुरू असलेल्या दारूच्या विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर येत आहेत. नशेच्या अवस्थेत भान सुटल्याने कौटुंबिक हिंसाचार, वाद-विवाद तसेच सामाजिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. यामुळे परिसरातील सामाजिक सलोखा बिघडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
या गंभीर बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागेश यलपा पलपवार व समस्त इंदिरा आवास नगर येथील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर व उपजिल्हाधिकारी देगलूर यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिसरात शांतता व सुरक्षितता राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


















