सोलापूर – आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि त्याचे देशांमध्ये होणारे परिणाम यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झाटापट झाली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारच्या काही निर्णयांमुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होत असून त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने तात्काळ याकडे लक्ष देऊन संबंधित प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

























