मुक्रमाबाद – भारतीय सैन्य दलात 22 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून कर्मभूमीतून मायभूमीत आलेले मुक्रमाबाद नगरीचे भूमिपुत्र सैनिक व्यंकट बाबुराव सूर्यतले यांची दि.२ फेब्रुवारी सोमवार रोजी मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमीती विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारत माता की जय या आवाजात उत्साहात मानवंदना दिल्यानंतर अकॅडमी पासून रॅली ची सुरुवात झाली तसेच सैनिक व्यंकट सूर्यतले यांच्या हस्ते मुखेड शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.
मुखेड शहरातील मुख्य रस्त्याने डीजे च्या आवाजात जन्मभूमी मुक्रमाबाद पर्यंत भव्य मोटारसायकल रॅली व मिरवणूक काढण्यात आली..मुखेड शहरातील व बाराळीतून रॅली जात असताना गाडी थांबवून जागोजागी अनेक नागरिकांनी सैनिक व्यंकट सूर्यतले यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला..त्यानंतर मुक्रमाबाद येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रा विजय खानापूरे यांचा सोहम प्रस्तुत देशभक्तीपर बहारदार गीतांचा कार्यक्रम तसेच रात्री 08 वाजता ह भ प वैजनात महाराज थोरात हिंगोलीकर यांचे समाज परिवर्तनावर कीर्तन पार पडले.
या भव्य नागरि सत्कार सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे होते. तर उद्घाटक मुक्रमाबाद नगरीचे सरपंच सौ. अंजिताताई बोधणे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शंकर मोरे, काँग्रेस नांदेड जिल्हा सरचिटणीस दिनेश आप्पा आवडके, ग्रा.प.सदस्य बालाजी बोधने, सैनिक सय्यद इब्राहिम, उपसरपंच चांद साब खुरेशी, गंगाधर सावकार वट्टमवार, प्रा.अरुण भोसले, पत्रकार रज्जाक कुरेशी, पत्रकार जलील पठाण, पत्रकार संजय राचलवार, आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी बालाजी आप्पा बोधणे यांनी केले तर पत्रकार रजाक कुरेशी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
आपले मनोगत व्यक्त करत असताना सैनिक व्यंकट सूर्यतले यांनी हा सन्मान सोहळा पाहून माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला असता पण ते आज आमच्यात नाहीत या गोष्टीचे खूप दुःख वाटते. तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये माझा सहभाग होता आणि तिथला एक धक्कादायक किस्सा सांगत 22 वर्षाचा खडतर प्रवास व गरीबीतलं बालपणही उपस्थितांना अगदी भावुक होऊन सूर्यतले यांनी सांगितले तसेच मुलगा प्रीतम आणि मुलगी प्रणाली यांनीही आपले पप्पा जेव्हा नसायचे तेव्हा मम्मी कशी दिवस काढायची आणि पप्पांना कशी हिम्मत द्यायची घरचा बाप जेव्हा घरी नसतो तेव्हा घरची परिस्थिती काय असते ते आम्ही स्वतः अनुभवलंय अशा भावना दोन्ही लेकरांनी व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी बोलत असताना म्हणाले की आई-वडिलांची आणि सैनिकांची जिवंत असतानाच सेवा आणि सन्मान करा,, खरा देव माणसात असतो, देवाला माणसात बघा दगडात नाही. कारण आई-वडिलांमुळे आपण आहोत आणि आपला परिवार सोडून देशाच्या सीमेवर माझा सैनिक तैनात आहे म्हणून आपण आपल्या परिवारात सुखरूप आहोत..सैनिकाला जात धर्म पंथ आणि स्वार्थ नसतो ज्याचं चारित्र सुद्धा आहे, ज्यांच्यावर आई-वडिलांचा संस्कार आहे आणि ज्याचं काळीज वाघासारखं निर्भीड आहे त्याला सैनिक म्हणतात असे बोलताना डुमणे पाटील यांनी सैनिकांचं बलिदान समजावून सांगितले.. त्यानंतर सैनिक सय्यद इब्राहिम यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…या सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने राजे छत्रपती अकॅडमीचे विद्यार्थी तसेच गावातील मान्यवर, माता भगिनी व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
रक्त कोणासाठी, का आणि कधी सांडायचे जेव्हा या देशातील तरुणांना कळेल तेव्हा भारत देश महासत्ता होईल…!!
तरुणांमध्ये आत्महत्या व व्यसनाचं प्रमाण वाढत चालय, बाल आणि तरुण वयातील लेकरांकडे पाहणं हे पालकांचं अधिक कर्तव्य आहे,,नाही तर येणारा काळ तुम्हा आम्हाला पहावसं वाटणार नाही.!!
हा मोलाचा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी व्यक्त केला






















