राज्य सहकारी बँकेच्या ४३० कोटी रुपयांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी विठ्ठल कारखान्याची तीन गोदामे २६ एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेने सील केली होती. चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारखान्याला मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सात दिवसांनंतर गोडावूनचे सील काढण्यात आले.
श्री विठ्ठल साखर कारखान्याकडे २०२१ पूर्वीचे थकीत ४३० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जच्या वसुलीसाठी यापूर्वीही राज्य सहकारी बँकेने जप्तीची नोटिफिकेशन काढलेले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे कारवाई टळली होती. दरम्यान २०२२ साली विठ्ठल कारखान्यात सत्तांतर होऊन अभिजित पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली होती. दि. २५ एप्रिल रोजी न्यायालयातील कारखाना जप्तीचा स्थगिती आदेश उठताच २६ एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेच्या पथकाने विठ्ठल सहकाराची ३ गोदामे सील केली आणि कारखाना जप्तीची प्रक्रिया सुरू केली होती.
त्यानंतर शुक्रवारी ३ मे रोजी राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठल कारखान्याच्या गोदामास लावलेले सील काढले आहे.जुन्या संचालक मंडळाने कारखान्यावर कर्ज काढून थकवले होते. डीआरटी कोर्टात हे प्रकरण होते. कोर्टाच्या आदेशानुसार सील लागले होते; परंतु कोर्टाच्याच आदेशानंतर सील निघाले आहे, २० मेपर्यंत कर्ज परतफेडीचा अहवाल देण्याच्या अटीवर सील काढले आहे. अशी माहिती चेअरमन अभिजित पाटील चेअरमन यांनी दिलीय.