सोलापूर – जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर बैरागवाडी मोडनिंब (ता. माढा) येथील शेतकरी कन्या पूनम किसन सुर्वे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे मोडनिंब परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पूनम सुर्वे यांचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयात झाले.
या विद्यालयाच्या शिस्तबद्ध व संघर्षशील वातावरणामुळे त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण शेटफळ येथे पूर्ण केले.अकरावी-बारावीत असतानाच एमपीएससीद्वारे अधिकारी होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी बी.ए. शाखेत प्रवेश घेतला आणि पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. दररोज सातत्याने १० ते १२ तास अभ्यास करून त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. सातत्याने अभ्यास करणे हे मोठे आव्हान असतानाही त्यांनी अनेक अडचणींवर मात करत तयारी सुरू ठेवली.
५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेत त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत मुख्य परीक्षेची तयारी अधिक जोमाने केली. त्यानंतर कठोर मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पार करत त्यांनी मुलाखतीचा टप्पा गाठला. अखेर ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या मुलाखतीतही उत्तम गुण मिळवत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद पटकावले.पूनम सुर्वे यांच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.


























