लासूर – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.० ६ ) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
या प्रकरणी लासूर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळा क्रमांक २० मध्ये अडत व्यवसाय करणारे व्यापारी प्रदीप सुरजमल लोहाडे (रा. परसोडा ता. वैजापूर) यांचे ‘दीपचंद सुरजमल अँड कंपनी’ नावाचे दुकान आहे.
मंगळवारी दुपारी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १० लाख रुपये काढून आणले होते.
ही रक्कम दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आली होती. यापूर्वीच ड्रॉवरमध्ये ३ लाख ३७ हजार रुपये ठेवलेले होते.
व्यापारी लोहाडे हे काही वेळासाठी दुकानाबाहेर माल पाहण्यासाठी गेले असता, ही संधी साधून अज्ञात चोरट्याने मागील बाजूचा दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला. ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील १३ लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली.
दुकानात परत आल्यानंतर ड्रॉवर तोडलेला व पैसे गायब असल्याचे लक्षात येताच लोहाडे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पिशवी घेऊन जाणारा संशयित चोरटा कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे.शिल्लेगाव पोलिसांनी त्वरित तपास सुरु केला असून याबाबद काही माहिती मिळाली असून त्यावर तपास सुरु असल्याचे शिल्लेगाव पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे लासूर स्टेशन परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
























