महापालिकेला जलसंपदा विभागाने आकारलेली सुमारे २९६ काेटी रुपयांची अवाजवी पाणीपट्टी रद्द झाली आहे. पालिका जेवढा पाणी उपसा करेल तेवढीच पाणीपट्टी अदा करण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिल्याची माहिती सार्वजनिक आराेग्य अभियंता व्यंकटेश चाैबे यांनी दिली.
चाैबे म्हणाले, महापालिका उजनी ते साेलापूर जलवाहिनी, औज बंधारा, हिप्परगा तलाव या तीन याेजनांवरून पाणी पुरवठा करते. प्रत्यक्षात उपशानुसार जलसंपदा विभागाला पाणीपट्टी दिली जाते. जलसंपदाच्या भीमा विकास विभागाने नाेव्हेंबर २०१५ मध्ये अवाजवी पाणीपट्टी आकारण्यास सुरुवात केली. विशेष शासनाने त्यावेळी दुष्काळ जाहीर केलेला नसताना २००४ च्या शासन निर्णय दाखवून हा निर्णय घेतला हाेता. या विरुध्द महापालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अपील दाखल केले. या याचिकेवर दाेन दिवसांपूर्वी निकाल झाला.