वेळापूर – पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता कमिटीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या बैठकीला जि.प. सदस्या सौ. मिनाक्षी सरतापे, माजी पं. स. सदस्या सौ. रेणुका माने देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष महिला सोलापूर जिल्हा उपाध्यक्षा सौ. अश्विनी भानवसे, ग्रामपंचायत सदस्या सौ. सीमा खाडे, सौ. निलम बनसोडे, डॉ. देशपांडे, सौ. पूनम शिंदे, महिला पोलीस कर्मचारी सौ. प्रियांका सुर्यवंशी आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
यावेळी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्व महिलांचा वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल महिला दक्षता कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रभारी अधिकारी आशिष कांबळे म्हणाले, “महिला दक्षता कमिटीतील सदस्य महिला या पोलीस प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची कडी आहेत. वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये महिलांविषयी दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये पीडित महिलांना समुपदेशन करण्यासाठी या महिला नेहमी तत्परतेने उपस्थित राहतात. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक प्रकरणे समजुतीने आणि संवेदनशीलतेने हाताळता येतात.
कमिटीतील सदस्यांनी परिसरातील महिलांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या हक्कांविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे. समाजात सुरक्षित आणि सशक्त वातावरण निर्माण करण्यासाठी महिला दक्षता कमिटीचे कार्य अत्यंत मोलाचे आहे असे सांगीतले.























