तभा फ्लॅश न्यूज/बाळासाहेब गावडे : अंबड शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर दोन ते तीन दिवसांनी शहरात कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असूनही पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने चोरांचे मनोबल वाढले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एसबीआय बँकेतून एका व्यापाऱ्याचे रु. २,३०,०००/- ची रोकड घेऊन चोरट्यांनी पळ काढल्याची घटना ताजी असतानाच, आता वाहन चोरीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. १६ जुलै रोजी रात्री दैनिक पुढारीचे पत्रकार रवींद्र कारके यांच्या पाचोड रोडवरील घरासमोरून एम.एच.-१२ डी.एम.-८७०६ क्रमांकाची अल्टो कार चोरट्यांनी पळवली. या घटनेला दोन-तीन दिवस उलटले नसतानाच, १९ जुलै रोजी रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास शिक्षक कॉलनीमधील शिक्षक अजिनाथ दिनकर शिरसाट यांच्या घरासमोरून एम.एच.२१-बी.एफ.-०९५९ क्रमांकाची मारुती सुझुकी ब्रेझा गाडी चोरीला गेली.
या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चोरांना कोणताही धाक राहिलेला नाही आणि गुन्हेगार बेधडकपणे चोरी करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. चोरींचे प्रमाण वाढले असून, अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नसल्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीकडे पोलीस महानिरीक्षक यांनी तातडीने लक्ष घालून, चोरांचा तपास लावण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.