नाशिक, ७ जुलै, (हिं.स) : जय जगन्नाथ, जय जय जगन्नाथ असा जयघोष करत रविवारी (दि. ७) सकाळी श्री जगन्नाथ पुरी नाशिकमध्ये पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ सवाद्य रथ यात्रा काढण्यात आली. नाशिक शहरातून मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या रथयात्रेत चिमुरड्यापासून अबाल वृद्धांनी सहभाग घेतला. महिलांना देखील रथ ओढण्याचा मान मिळाला.
पुरुष भाविकांसह शेकडो महिला भाविकांनी रथ ओढण्याचे काम केले. रविवारी सकाळी आठ वाजता ब्रह्म वृंदांच्या उपस्थितीत भगवान श्रींची पूजा, आरती, श्रृंगार व भोग नैवेद्य त्यानंतर नऊ वाजता भगवद भक्तांचे आगमन झाले. जगन्नाथ पूजन करून, रथात भगवान जगन्नाथाची मूर्ती स्थापन करण्यात येऊन सकाळी साडे दहा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन , आरती करून श्रीफळ वाढवून रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला.
जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथून निघालेली सवाद्य रथयात्रेत अग्रभागी पारंपरिक वाद्य, ढोल पथक बँड मर्दानी खेळ कैलास मठ पाठ शाळेचे विद्यार्थी, ध्वज, कीर्तनकार, पारंपारिक वाद्य तसेच रथाच्या दोन्ही बाजूला दिगंबर आखाडा आणि श्री खाकी आखाड्याचे हनुमान ध्वज निशान तसेच ब्रह्मवृंद मंत्रोच्चार व वेद पठण करत रथ पुढे गणेशवाडी दिशेने मार्गस्थ झाला.
सोहळ्यात सामाजिक उपक्रम म्हणून धर्माचे तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी जलरक्षा नदी सुरक्षा पर्यावरण बचाव, वृक्ष वाटप करत पर्यावरण बचाव जनजागृती करण्यात आली. रथोत्सवात सहभागी लहान बालकांनी विविध देवदेवतांची साकारलेली वेशभूषा सर्वांचेच आकर्षण ठरले.
रथोत्सव मार्गावर महिला भाविकांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून रथावर पुष्पवृष्टी करून रथयात्रेचे शेकडो स्वागत केले. श्रीराम रथ मानकरी असलेल्या समस्त पाथरवट समाज कार्यकर्त्यांनी जगन्नाथ रथ ओढत धुरा सांभाळली.
रथोत्सवात पंचमुखी हनुमान मंदिर महंत भक्तीचरणदास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, मनपा आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर दशरथ पाटील, स्वामी रामतीर्थ महाराज, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, ज्येष्ठ उद्योजक किशोर राठी, सोमेश्वर संस्थांचे माजी अध्यक्ष राहुल बर्वे, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सतनाम राजपूत, उमापती ओझा, किरण सोनवणे, नंदू मुठे, सचिन डोंगरे, सचिन लाटे, ब्रह्मदत्त शर्मा, दिगंबर धुमाळ, नागेश चव्हाण, नितीन शेलार, प्रसाद सानप, पर्यावरण प्रेमी निशिकांत पगारे, योगेश बर्वे, अजित शेळके, दिपक लाटे, सागर खारे, वैभव खैरे, नरहरी उगलमुगले, आदिंसह भाविक सहभागी झाले होते. रथ यात्रेनिमित्त रथोत्सव मार्गावर पंचवटी पोलिस ठाण्यातर्फे चोख पोलिस बळ तैनात करण्यात आले होते.
चौकट
रथोत्सव मार्ग असा…
रविवारी श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला. पुढे रथयात्रा आडगाव नाका, गणेशवाडी,आयुर्वेद रुग्णालय, गाडगे महाराज पूल, नेहरूचौक, मेन रोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सितागुंफा मार्गे, श्री काळाराम मंदिर, नागचौक, श्री काट्या मारुती मंदिर चौक,श्री कृष्णनगर आदी भागातून जात दुपारी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सांगता करण्यात आली. रथयात्रे नंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.